ठाण्यातील कशिश पार्क येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाण्यातील कशिश पार्क येथे रक्तदान शिबिराचे आयोजन




ठाणे 


कोरोना विषाणू संसर्ग काळात विविध आजारांवर रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासू शकते यासाठी रक्तदान करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कशिश पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व महाराष्ट्र माझा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानाला तरुणांनी चांगला प्रतिसाद देत जवळपास शंभरच्या पुढे रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत शासनाला मदतीचा हात देत सहकार्य केले. याचबरोबर शासन-प्रशासनाच्या सूचनेनुसार रक्तदान करताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. रक्तदान करताना दोन रक्तदात्यांमध्ये एक मीटर अंतर राखून रक्तदानाची व्यवस्था केली होती. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे इतर विविध आजारांवरही उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक व शिक्षण समिती सभापती विकास कृष्णा रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या पुढाकाराने व कशिश पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व महाराष्ट्र माझा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील कशिश पार्क येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.