ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली
ठाणे
ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातले पत्र पाठवले आहे. डॉ. विपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा असं कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. मार्च २०२० ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे...!