महसुली तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांची धडपड- गृहनिर्माण मंत्री
मुंबई:
गेल्या काही दिवसांतील महसुली तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळं पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीसारख्या शहरात डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झालं आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. इंधनांच्या या वाढत्या किंमतींवरून आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला हाणला आहे. देशभरात रोजच्या रोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी भाजपनं लावलेलं पोस्टरच आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
आव्हाड यांनी याआधीही इंधनांच्या वाढत्या दरांवरून एक ट्विट केलं होतं. 'देशातील जनता सध्या करोना व्हायरसचा सामना करण्यात गुंतली आहे. शिवाय, भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. या साऱ्यातून इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाणार नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे,' असं त्यांनी म्हटलं होतं. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात इंधनाच्या किमतींचा दैनंदिन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी नियमित दर निश्चिती पुन्हा सुरू केली. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. कच्च्या तेलाच्या किंमती मात्र या काळात वाढत होत्या. हा तोटा भरून काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता दरवाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही दिवस पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता आहे.