सध्या केवळ मुख्य मार्गांवरून धावणार टीएमटी

सध्या केवळ मुख्य मार्गांवरून धावणार टीएमटी


ठाणे :


मुंबईत बेस्ट सेवा करण्यात आली आहे. मात्र ठामपाची बससेवा कधी सुरु होणार याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा झाल्यानंतर आता ठाण्यातही टीएमटीची सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सुमारे १०० बसेस पहिल्या टप्प्यात रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोन वगळता मुख्य रस्त्यांवरून त्या धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही बसमध्ये प्रवाशांनी करावे, असेही स्पष्ट केले आहे. यासाठी आता पोलिसांबरोबर चर्चा करून ही सेवा कशा पद्धतीने सुरू करायची याचा निर्णय घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत ही सेवा सुरू केली जाणार आहे.


शहरात आजघडीला २८० च्या आसपास कंटेनमेंट झोन आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू करतांना याचाही विचार केला जाणार आहे. तसेच या संदर्भात पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून कशा पद्धतीने सेवा सुरु करायचे हे निश्चित केले जाणार आहे. असे असले तरी शहरातील तीनहातनाक्यावरून ती सुरू केली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. या ठिकाणाहून घोडबंदर, वागळे, लोकमान्यनगर, पोखरण आदींसह इतर प्रमुख मार्गावर मुख्य रस्त्यांवरच बस धावणार आहेत. गेले जवळजवळ दोन महिने ठाणे महापालिकेची परिवहन सेवादेखील कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद होती. आता अनलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सेवा सुरू केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.