टाळेबंदीची कडक अंमलबजावणीचे आदेश- पालकमंत्री

टाळेबंदीची कडक अंमलबजावणीचे आदेश- पालकमंत्री


ठाणे


करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणारी ठिकाणे अतिसंक्रमित (हॉटस्पॉट) म्हणून जाहीर करण्याबरोबरच लोकांना त्याची माहिती देण्याचे आणि पोलिसांच्या मदतीने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली.


टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात तपासणी आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याबरोबरच घरोघरी जाऊन प्रत्येक रहिवाशाची तपासणी केली जाणार आहे. पूर्वीपेक्षा या टाळेबंदीचे स्वरूप वेगळे असेल, असा दावा सूत्रांनी केला. ठरावीक क्षेत्रात ही टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळपासूनच पोलिसांच्या वाहनांमधून प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीसंबंधित सूचना देण्यास सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली परिसरातील काही भागांमध्ये शीघ्र कृती दलाची मदत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली.


रुग्णसंख्या वाढत असल्याने यापूर्वीच भिवंडी आणि अंबरनाथ शहरांत पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. उल्हासनगर आणि बदलापूरमध्येही काही भागांत टाळेबंदीचा विचार सुरू असून जिल्ह्यातील प्रमुख शहरांची वाटचाल संपूर्ण टाळेबंदीच्या दिशेने सुरू झाली आहे. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांमधील अतिसंवेदनशील क्षेत्रांत २९ जूनपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने सुरू केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या तीनही शहरांचे प्रशासकीय प्रमुख आणि पोलीस प्रमुखांबरोबर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढणारे सर्व भाग पूर्ण बंद करून तेथील प्रत्येक घरात तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.