ठाण्यात २८० तर कल्याण-डोंबिवलीत १४९ ठिकाणी कोणतेही व्यवहार सुरू करणे शक्य नाही

ठाण्यात २८० तर कल्याण-डोंबिवलीत १४९ ठिकाणी कोणतेही व्यवहार सुरू करणे शक्य नाही


ठाणे


ठाणे जिल्ह्य़ात यापूर्वी अंबरनाथ, बदलापूर शहरांतील बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या शहरांमधील महापालिकांनीही सवलतींची यादी जाहीर करत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. असे असले तरी ठाणे पोलिसांनी दोन दिवस आधीच संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत चारपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केल्याने अनेक व्यावसायिक गोंधळात सापडले आहेत. याशिवाय संपूर्ण जिल्ह्य़ात एक हजाराहून अधिक प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आले असून ठाण्यात २८०, कल्याण-डोंबिवलीत १४९ ठिकाणी कोणतेही व्यवहार सुरू करणे अजूनही शक्य होणार नाही.


ठाणे महापालिका हद्दीत महापालिकेने सायंकाळी उशिरा २८० प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी झाली असली तरी मुख्य बाजारपेठा, नौपाडासारख्या व्यावसायिक केंद्रालगत प्रतिबंधित क्षेत्रे कायम असल्याने दुकाने सुरू करताना हा अडथळा कायम राहील अशीच चिन्हे आहेत. राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अधीन राहून मंगळवारी ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुकाने सुरू करण्यास तसेच संचारबंदीत शिथिलता आणण्यासाठी नव्या आदेशांची जंत्रीच जाहीर केली खरी मात्र या शहरांमधील प्रतिबंधित क्षेत्रांचे दुखणे अजूनही कायम असल्याने बराचसा भाग टाळेबंदीतच अडकून पडेल असे चित्र दिसू लागले आहे. ठाण्यात नौपाडा भागात ३९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र असून या ठिकाणी दुकाने सुरू करताना अडचणी उभ्या राहाणार आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे, तुर्भे उपनगरांमध्ये जिल्ह्य़ातील सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र असल्याने तेथे देण्यात आलेल्या सवलतीदेखील कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत