केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लोकल सेवा

केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लोकल सेवा



मुंबई: 


अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची विनंती राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला केली होती. सरकारच्या या मागणी नुसार रेल्वे राज्य सरकारकडून एसओपी ( स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मागितले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांची यादी राज्य सरकार रेल्वेकडे देणार असल्याचं सांगण्यात येतं.  त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत असला तरी मुंबईत पुढच्या आठवड्यापासून लोकल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय लोकल सुरू झाल्यानंतर या लोकल केवळ महत्त्वाच्या ठिकाणीच थांबणार आहेत. राज्याच्या मागणीनंतर रेल्वेने राज्य सरकारकडून एसओपी मागितल्याने मुंबईतील लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता बळावल्याचं सूत्रांनी सांगितलं. लॉकडाऊनपूर्वी मुंबईत रोज ८० लाख लोक रोज प्रवास करायचे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून प्रवाशांची ये-जा असायची. मात्र, लोकलच्या गर्दीमुळे करोना फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, आता अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी एसटी आणि बसची सेवा अपुरी पडत असून बसचा प्रवास वेळ खाऊ असल्याने राज्याने लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.