वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांचे हाल

वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांचे हाल


ठाणे : 


गेल्या वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शिळ रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पाऊस सुरु झाल्याने काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत येथून अनेकजण मुंबई ठाण्यातील कार्यालये गाठण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत. तर, मुंबईतील बेस्ट, राज्य परिवहन, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बसगाडय़ाही या रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे शिळफाटा मार्गावर सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास दिव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कामगारांना होत आहे. विनाकारण होणाऱ्या या कोंडीत दिव्यात येणाऱ्या बस अडकून पडत असल्याने दिव्यातील प्रवाशांना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एक ते सव्वा तासाहून अधिक वेळ लागत आहे.


लोढा, कल्याणफाटा आणि शिळफाटय़ाची ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक हे डोंबिवली मानपाडा येथून उजवीकडे वळण घेऊन दिवा-आगासन मार्गाचा पर्यायी वापर करत आहेत. मात्र, दिवा-आगासन रस्ता अतिशय अरुंद असून त्यातच हा रस्ता ठाणे महापालिकेतर्फे मलनि:सारण वाहिन्यांच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. दिव्यातील हा मुख्य रस्ता खोदण्यात आल्याने या ठिकाणी यापूर्वीच वाहतूक कोंडी होत होती. त्यातच शिळफाटा रस्ता टाळणाऱ्यांची या रस्त्यावर नव्याने भर पडली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून दिवा-आगासन रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.