कोरोना चाचण्यांचे प्रमाण तात्काळ वाढवा - अविनाश जाधव

कोरोना चाचण्यांचे प्रमाण तात्काळ वाढवा 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची मागणी 

 

ठाणे

ठाणे शहरात कोरोना आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाची चाचणी होण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. याकाळात विविध आजार डोके वर काढतात, त्यामुळे ठाणे शहरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबात तात्काळ पावले उचलावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे/ पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

कोरोना या संसर्गजन्य आजाराने ठाणे शहरात कहर केला आहे. रोज अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आता पावसाळा आला आहे. या मौसमात सर्दी, ताप, खोकला असे आजार होतात. त्यामुळे कोरोनाची चाचणी होण्याची संख्या वाढविणे अपेक्षित आहे.  ठाणे शहरात सध्या कोरोनाची चाचणी दोन खाजगी लॅब मार्फत होत आहे. तर एक लॅब बंद करण्यात आली आहे. या दोन खाजगी लॅब आणि वाडीया रुग्णालय धरून ठाणे महापालिका हद्दीत दिवसाला फक्त शंभरच चाचण्या होत आहेत. पावसाळ्यात कोरोनाची चाचणी होण्याचे प्रमाण वाढविणे अपेक्षित आहे अन्यथा हाहाकार माजेल. राज्य शासनाने कोरोना चाचणीचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तरी पालिकेने कोरोना चाचणीची संख्या वाढवावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.