शहरातील रूग्णालयमधील बेडसची स्थिती आता एका क्लीकवर
महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित
ठाणे
ठाणे शहरामध्ये कोरोना कोव्हीड 19 रूग्णांना े महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गौरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ निर्माण केले आले आहे. शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता यावे यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये युद्धपातळीवर ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
ठाणे शहरामध्ये कोणती रूग्णालये कोव्हीड रूग्णालये आहेत, त्याची एकूण क्षमता काय आहे, तिथे रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाटांची उपलब्धता आहे किंवा नाही याची ॲानलाईन माहिती ठाणेकर नागरिकांना मिळावी यासाठी विशेष संकेतस्थळ निर्माण करण्याविषयी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या. महापौर नरेश गणपत म्हस्केही याबाबत पाठपुरावा करीत होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
या संकेतस्थळावर रूग्णालयाचे नाव, ते रूग्णालय सिमटोमॅटीक की असिमटोमॅटीक रूग्णांकरिता आहे, त्या रूग्णालयामधील एकूण खाटंची क्षमता, सद्यस्थितीत रूग्णांनी व्याप्त खाटांची संख्या आणि उपलब्ध खाटांची संख्या याची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्या रूग्णालयामध्ये आयसीयू युनिटस् आहेत, त्याची क्षमता किती आहे आणि सद्यस्थितीत त्या आयसीयू युनिटमध्ये किती खाटा उपलब्ध आहेत याचीही अद्ययावत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे त्या त्या रूग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी रूग्णालयांचा संपर्क क्रमांकही देण्यात आलेला आहे. त्यामुळे रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रूग्णालयांच्या खाटांसाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही. यामध्ये जे रूग्ण कोव्हीड बाधित आहेत पण त्यांना कोणतीही लक्षणे नाही अशा रूग्णासांठी कुठे व्यवस्था करण्यात आली आहे याचीही माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळामुळे कोव्हीड 19 रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.