निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी दिली आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट
आपत्तीच्या काळात जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्या - पालकमंत्री
ठाणे
निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती कक्षास भेट देवून निसर्ग चक्री वादळाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. दरम्यान आज सकाळी महापालिका आयुक्तांनीही आपत्कालीन कक्षास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ना. शिंदे यांनी महापालिकेच्यावतीने निसर्ग चक्री वादळाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे यापुढे आपत्तीच्या काळात जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्याच्या काळात प्रशिक्षीत स्वीमर्स आणि पानबुडे तैनात करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते.