गणेशमुर्तीचे भाव ५०० ते १ हजार रुपयांनी वधारले

गणेशमुर्तीचे भाव ५०० ते १ हजार रुपयांनी वधारले


ठाणे


दरवर्षी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात गणेशोत्सवासाठी रायगड येथील पेण परिसरातून मोठय़ा प्रमाणात आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असतात. मुंबई आणि ठाण्यातील अनेक  छोटे कारखानदार पेण येथील गणेशमूर्ती विक्रीसाठी आणतात. यंदा कोरोनामुळे पेण आणि आसपासच्या भागांत असणाऱ्या हमरापूर, अपटा यासारख्या अनेक छोटय़ा ग्रामपंचायतींनी सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक व्यापाऱ्यांना गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी पेण येथे जाणे शक्य झालेले नाही. अनेक मूर्तिकारांनी यंदा मूर्तीची ऑनलाइन विक्री सुरू केली होती. या ऑनलाइन सुविधेलाही ठाणे मुंबईच्या कारखानदारांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.  त्यातच ठाणे जिल्ह्य़ात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यंदा गणेशमुर्तीचे भाव ५०० ते १ हजार रुपयांनी वधारले असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह आसपासच्या शहरांत साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या टाळेबंदीचा फटका सुप्रसिद्ध पेणच्या मूर्तीनाही बसण्याची शक्यता आहे.