धोकादायक इमारतींना दुरूस्ती परवानगी देताना काळजी घेणार - आयुक्त

झोपडपट्टी, दा़ट लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार


धोकादायक इमारतींना दुरूस्ती परवानगी देताना काळजी घेणार


अधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या सूचना



ठाणे


 झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी उद्यापासून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे वितरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. दरम्यान धोकादायक इमारतींना दुरस्ती देताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण खातरजमा करूनच देण्यात याव्यात अशा सूचनाही श्री. सिंघल यांनी आज सर्व प्रभागस्तरिय अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान आयुष मंत्रालयाने सुचविलेली होमिओपॅथीक आणि आयर्वेदिक औषधे दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसरात वितरित करण्यात येणार आहेत.


      कोरोना विरूद्धचा लढा किती दिवस चालणार आहे हे आज कोणीही सांगू शकत नाही आणि इतर आपत्तीपेक्षा ही आपत्ती वेगळी असल्याने कोणतीही परवानगी देताना ती काळजीपूर्वक देण्यात यावी असे सांगून श्री. सिंघल यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जेव्हढी कडक अंमलबजावणी करता येईल तितकी कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.


      सर्व अधिकारी चांगले काम करीत आहेत असे अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी कॅान्टॅक्ट ट्रेसींग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोना बाधित रूग्णांचे अति जोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तात्काळ वर्गवारी करावी, बाधित रूग्णांना तातडीने स्थलांतरित करावे जेणेकरून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोरानाचा संसर्ग वाढू नये, कोरोना बाधितांची संख्या कुठे वाढत आहे, कशामुळे वाढते आहे याचा व्यवस्थित अभ्यास करावा अशा अनेक महत्वाच्या सूचना महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी दिल्या.


      दरम्यान आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक गोळ्या उद्यापासून दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी असलेल्या परिसरात वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये वागळे प्रभाग समितीमधील सी. पी. तलाव, किसननगर, पाईपलाईन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरूवातीस वितरित करण्यात येणार आहेत.