सुविधा केंद्रांचे रुंपातर कोरोनासाठी खास रुग्णालये किंवा क्वॉरंटाइन केंद्रात

सुविधा केंद्रांचे रुंपातर कोरोनासाठी खास रुग्णालये किंवा क्वॉरंटाइन केंद्रात



ठाणे


ग्लोबल इम्पॅक्ट हब, स्टेडियम बॅडमिन्टन हॉल, ब्रम्हाड दोस्ती होम, हाजुरीमध्ये कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर आदी ठिकाणी विविध विविध प्रयोजनासाठी जी मोठमोठी सुविधा केंद्रे उभारली आहेत, त्यांचे रुंपातर कोरोनासाठी खास रुग्णालये किंवा क्वॉरंटाइन केंद्रात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. या ठिकाणी विशेष बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची राज्याच्या कमिटीने पाहणी केल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तर शहरातील इतर खाजगी रुग्णालयेदेखील कोरोनासाठी वापरता येतील, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


यात ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये १५०० बेडची सुविधा केली जाणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत शहरात रोज १५ ते २० रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे हा आकडा ३०० च्या जवळ जाऊन पोहचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरूआहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांच्या संपर्कात येत असलेल्या क्वॉरंटाइन करून ठेवण्यात येत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे यावर ठोस उपाय योजण्याचे निश्चित केले आहे.


रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी, क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात येत असलेल्यांसाठी योग्य ती सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. यानुसार आता साकेत येथे असलेल्या ग्लोबल इन्पॅक्ट हब या ठिकाणी १५०० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


याशिवाय स्टेडियमध्ये बॅडमिंटन हॉल असेल तसेच त्या ठिकाणी असलेले इतर हॉल असतील येथेही बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ब्रम्हाड येथील दोस्तीच्या घरांमध्येही अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तर हाजुरी येथील कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरच्या ठिकाणीदेखील विशेष बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय काही खाजगी हॉस्पीटलदेखील आता याच आजारावर उपचार करण्यासाठी राखीव ठेवली जाणार असून त्यांची यादीही तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.