ठामपाच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

ठामपाच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू


ठाणे


ठाणे महानगर पालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी ठरल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ५५ वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संबधींत कोणत्याही ड्युटी लावू नये असे असतांनाही त्यांना भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कार्यरत असलेले उप करनिरिक्षक हे मागील ११ मे रोजी कोरोनामुळे घोडबंदर भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर कोरोनाशी लढा देत असतांना मागील काही दिवस ते आयसीयुमध्ये व्हेटींलेटरवर होते. त्यातच शनिवारी त्यांचा मृत्यु झाला.


परंतु त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पालिकेने वर्तविला आहे.  त्यांची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यातून ते दोघेही बरे झाले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या लढाईत उप करनिरिक्षकाची हार झाली.


दरम्यान रविवारी त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. परंतु रविवारी सुटटी असल्याने शनिवार हाच त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी त्यांच्या आयुष्याचाही असा दुर्दैवी शेवट झाल्याने महापालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मागील सलग दोन वर्षे त्यांनी कर वसुलीत उच्चांक गाठला होता. मागील आर्थिक वर्षात त्यांनी १०८ टक्के वसुली केली होती. यंदाही त्यांनी १०२ टक्के वसुली केली होती. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून झाले होते. सेवा निवृत्तीच्या यादीतही होते त्यांचे नाव महापालिकेच्या सेवेतून रविवारी ६४ कर्मचारी, अधिकारी, सफाई कामगार सेवा निवृत्त होणार होते. त्या यादीतही या उप करनिरिक्षकांचे नाव २१व्या क्रमांकावर होते. परंतु अशा पध्दतीने त्यांच्या आयुष्याचा शेवट होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.