डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि माझ्या मुलीने दिलेल्या जगण्याच्या उमेदीमुळे मी आज पुन्हा तुमच्यात - आ.जितेंद्र आव्हाड
ठाणे :
डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि माझ्या मुलीने दिलेल्या जगण्याच्या उमेदीमुळे मी आज पुन्हा तुमच्यात आलो आहे, कोरोनाची लागण झाल्याने चार दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या जगण्याची केवळ ३० टक्केच शक्यता असल्याचे सांगितले होते. तशी माहिती त्यांनी माझ्या मुलीला दिली; असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली आणि जवळजवळ ते २० ते २२ दिवस मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल होते. या कालावधीत त्यांनी मरणावर मात केली. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना मास्क, हँडग्लोव्हज यांचा वापर करायला हवा होता. मात्र, मी बेदरकारीतून ही बंधने पाळली नाहीत. घरचे सांगत असतानाही मी त्यांचे ऐकले नाही. अंगात थकवा होता, तो जाणवत होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी इस्पितळात दाखल होण्यास सांगत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मला केव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, माझा रिपोर्ट केव्हा पॉझिटीव्ह आला,रुग्णालयात मी व्हेंटीलेटरवर असताना त्या तीन ते पाच दिवसात काय काय घडामोडी घडल्या, हे मला काहीच माहित नाही.
कारण त्या पाच दिवस माझी मृत्युशी झुंज सुरु होती. मी व्हेंटीलेटवर असताना माझी प्रकृती पाहून डॉक्टरांनी माझ्या जगण्याची केवळ ३० टक्केच शक्यता असल्याचे माझ्या मुलीला बोलावून सांगितले होते. डॉक्टरांचे प्रयत्न, मुलीने जगण्याची दिलेली उमेद, माझी जगण्याची चिकाटी यामुळे मी काही दिवसांनंतर आयसीयुमधून बाहेर आलो. त्यानंतर मला समजत होते, परंतु मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. परंतु त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक चित्रविचित्र विचार थैमान घालतहोते. यातूनच त्याच वेळेस मी माझे मृत्युपत्र तयार केले. माझ्या पश्चात माझी संपत्ती मुलीच्या नावे करण्याचेही मी लिहून ठेवले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना मी सलाम करतो, त्यांनी केलेल्या सेवा सुश्रूषेमुळे, त्यांनी दाखविलेल्या आपुलकीमुळे, नर्सेसेने घेतलेल्या काळजीमुळेच मी आज पुन्हा नव्याने उभा आहे. आता पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करताना आयुष्यात खाण्यापिण्याची शिस्त बाळगण्याचे व अतिआत्मविश्वास न ठेवण्याचे, बेफिकिरीने न वागण्याचे मी निश्चित केले आहे.