रूग्णालयाच्या बाहेर महापालिकेने उभारले दराचे फलक
पालकमंत्री, महापौर, आयुक्त यांचा सतत पाठपुरावा
ठाणे
खासगी कोव्हीड रूग्णालयांकडून कोरोना कोव्हीड 19 बाधित रूग्णांकडून अवाजवी दराची आकारणी करू नये यासाठी महापालिका आग्रही असून महापालिकेच्यावतीने आता प्रत्येक खासगी रूग्णालयाच्याबाहेर दरांचे मोठे फलक लावले आहेत. दरम्यान नागरिकांची अडवणूक होवू नये यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल हे स्वतः याचा पाठपुरावा करीत आहेत.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच सर्व खासगी रूग्णालय व्यवस्थापनांना दर तक्ता दर्शनी भागावर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याची कार्यवाही होते की नाही याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनाही दिल्या आहेत. तसेच यासाठी प्रभाग समिती स्तरावर एक समितीही गठित केली आहे. तथापि नागरिकांना खासगी रूग्णालयातील महापालिकेने निश्चित केलेल्या दराची सहजपणे माहिती मिळावी यासाठी जी रूग्णालये कोव्हीड रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत त्या सर्व रूग्णालयाच्या बाहेर महापालिकेच्या वतीने मोठे फलक लावण्यात आले आहेत.