.... म्हणून नागरिक चक्रावले
ठाणे
मुळ ठाणे परिसरातील परिस्थिती अद्यापही आटोक्यात आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या भागात संपूर्ण टाळेबंदीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिले. असे असले तरी दिवसभराच्या वेगवेगळ्या अफवांनी नागरिक हैराण होत आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या खारकर आळी आणि जांभळीनाका परिसरातील घाऊक किराणा बाजारपेठ येत्या १७ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पण पोलिसांनी नौपाडा, पाचपाखाडी भागातील दुकाने तसेच भाजी विक्रेत्यांचे व्यवहारदेखील शनिवारी बंद करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात या क्षेत्रात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय अद्याप झाला नाही. तरी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाणेकर चक्रावले.
करोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये संपूर्ण टाळेबंदीचे निर्णय घेतले जात असले तरी अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. पोलिसांनी पूर्ण टाळेबंदी नसलेल्या नौपाडा, पाचपाखाडी भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच भाजी विक्रेत्यांनाही सकाळपासून हुसकून लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे या वस्तू दुकानांतून आणण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक गोंधळले. घोडबंदर परिसरात संपूर्ण टाळेबंदीच्या निर्णयाची काही भागांत काटेकोरपणे अंमलबजावणी होत होती. पण काही परिसरात मात्र दुकाने नेहमीसारखी सुरू होती. दरम्यान, १८ मेपर्यंत घोडबंदर भागात जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, चिकन आणि मटणाची दुकाने आणि घरपोच सेवाही सुरू राहतील, असे महापालिकेने पुन्हा स्पष्ट केले.