महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीची निवडणूक २७ मे पूर्वी घेण्यात यावी- महाविकास आघाडी
मुंबई:
करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीची निवडणूक २७ मे पूर्वी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी गुरुवारी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांमार्फत महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या नऊ सदस्यांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक अपेक्षित होती. तथापि, महाराष्ट्रासह देशातील करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे ती निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाच्या उभय सभागृहांपैकी एका सभागृहाचे सहा महिन्यात सदस्य होणे आवश्यक आहे. आमच्यापुढे त्यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक तातडीने घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे विधिमंडळ पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली मार्गदर्शक सूचना आणि अन्य सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी अंमलात आणलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन करून ही निवडणूक प्रक्रिया पार करण्यात येईल, अशी हमी काँग्रेसने आयोगाला दिली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारीच निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मंगळवारी राज्यपालांना केली होती. त्यानंतर गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक जाहीर करण्याची विनंती आयोगाला केली आहे.