सफाई कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

सफाई कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट


वसई


करोनाच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वसई-विरार महापालिकेने कामगार कपातीच्या नोटीस पाठविल्यानंतर सफाई कर्मचा-यांच्या कामाचे दहा दिवस कमी केले आहेत. पालिकेच्या या निर्णय़ाच्या विरोधात मंगळवारपासून सर्व सफाई कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. पालिकेचे धोरण हे कष्टकरी कामगारांच्या विरोधात राहिले आहे. त्यामुळे आम्हाला संपाचे हत्यार उगारावे लागत आहे, असे श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी सांगितले.


शहरावर करोनाचे संकट गडद झालेले असताना सफाई कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र, पालिकेने अचानक सफाई कर्मचाऱ्यांना केवळ २० दिवस काम करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना या वीस दिवसांचाच पगार मिळणार असून १० दिववसांचे वेतन बुडणार आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटीसाही पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.