कामगारांना आता आपापल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा, नाशिकहून धावली पहिली ट्रेन
मुंबई
मुंबई
विविध राज्यांत अकडलेल्या कामगारांना आता आपापल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी तसंच परप्रांतीय मजुरांसाठी आता विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था काही अटी आणि शर्थींसह सुरू केली आहे. मात्र यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हे आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपली नोंदणी होत नाही आणि प्रशासन सूचना देत नाही तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असं आवाहन रेल्वेने केलं आहे.
शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात कामगारांना आपल्या घरी जाण्याकरिता पहिली ट्रेन धावली. तेलंगणाहून झारखंडला ही पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. तर आज नाशिकहून लखनौच्या दिशेने देखील ट्रेन सोडण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्रेनला हिरवा कंदील दर्शवला आज जवळपास साडे आठशे कामगारांना घेऊन नाशिकहून लखनऊला विशेष ट्रेन रवाना झाली. नियोजित ट्रेन कालच नाशिकहून रवाना होणार होती. मात्र काही कारणास्तव उत्तरप्रदेश सरकारकडून मनाई करण्यात आल्याने काल ही ट्रेन स्थगित करुन आज रवाना करण्यात आली.