आधी विलीगिकरण कक्षात सुविधा पुरवा
मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची पालकमंत्र्यांवर टिका
ठाणे
ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाग्रस्तांसाठी एक हजार बेड चे रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे. या रुग्णालयासाठी लागणारे मनुष्यबळ कसे उपलब्ध होणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी करत ठाण्यात जे दोन विलीगिकरण कक्ष उभारले आहेत तिथे आधी सुविधा पुरवा अशी टिका केली आहे.
नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाग्रास्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाण्यात एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र या रूग्णालयासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी वर्ग कुठून आणणार असा प्रश्न अविनाश जाधव यांनी केला आहे. पालकमंत्री यांनी पोकळ घोषणाबजी न करता ज्यूपिटर सारखे रुग्णालय ताब्यात घ्यावे अशी सूचनाही अविनाश जाधव यांनी केली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे विलिगीकरण कक्षात विलिगीकरण केले जात आहे. ठाण्यात यासाठी दोन ठिकाणी विलिगीकरण कक्ष उभारले आहेत. मात्र या ठिकाणी असुविधांचा महापुर आहे. येथील नागरिक नरकयातना भोगत आहेत. वेळेवर अन्न नाही, अन्न मिळाले तरी ते खाण्यालायक नसते. प्यायला पुरेसे पाणीही नसते. दैनंदिन साफसफाई सुध्दा होत नाही. असुविधा असलेल्या या विलिगीकरण केंद्राकडे पालकमंत्र्यांनी आधी लक्ष द्यायला हवे, अशी सुचना अविनाश जाधव यांनी केली आहे.