बिहारी व बंगाली मजुरांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा

बिहारी व बंगाली मजुरांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा



मुंबई:


 महाराष्ट्रात असलेल्या बिहारी व बंगाली मजुरांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित राज्यांनी मान्यता दिल्यानंतर आज प्रथमच महाराष्ट्रातून बिहार व पश्चिम बंगालसाठी गाडी सोडण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली. स्थलांतरीत मजुरांची परवड थांबवण्यासाठी त्यांना आपापल्या राज्यात परतीची मुभा केंद्र सरकारनं दिली आहे. त्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत १९१ गाड्या सोडण्यात आल्या असून त्यातून २ लाख ४५ हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं आहे. त्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड व आंध्र प्रदेशातील मजुरांचा यात समावेश आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं.

केवळ बिहार व पश्चिम बंगाल सरकारनं स्थलांतरितांना प्रवेश देण्यास संबंधित राज्य सरकारांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं तेथील मजुरांसाठी कालपर्यंत महाराष्ट्रातून एकही गाडी सोडण्यात आलेली नव्हती. ही कोंडी फोडण्यासाठी शरद पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: नितीश कुमार व ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी मजुरांना घेण्याची तयारी दाखवली. त्यानुसार आज दोन्ही राज्यांसाठी गाड्या सोडण्यात आल्या. या दोन्ही राज्यांतील मजुरांसाठी आणखी किमान दहा रेल्वे गाड्या सोडाव्या लागणार आहेत. त्यासाठीही तेथील मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. 'सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. कुठल्याही मजुरांकडून प्रवास खर्च घेतला जात नाही. राज्यात आजही ३,८८४ शेल्टर हाऊसमध्ये जवळपास १० लाख कामगार तिथं असल्याची माहितीही त्यांनी दिली.