गरिबांसाठी कोविड रूग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार

होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी कोविड रूग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार



ठाणे


घोडबंदर रोड येथील होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील कोव्हीड बाधित रूग्णांवर राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा आज पासून सुरू करण्यात आली असल्याने आता कोव्हीड बाधित गरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.      शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना कोव्हीड - १९ घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते. याच पार्श्वभूमीवर पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना या रूग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल प्रयत्नशील होते. त्यानुसार आजपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.      या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत कोविड -१९ उपचार मोफत दिले जाणार आहेत. ही योजना आज 1 मे 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. या विषयी अधिक माहितीसाठी 022-68556855 आणि 86575 8101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.