असंघटीत गटई कामगारांना अर्थसाह्य देण्याची मागणी
ठाणे
असंघटीत असलेले अन् चप्पल शिवण्याचा व्यवसाय करुन उपजिवीका करणार्या गटई व्यावसायिकांना शासनाने लॉकडाऊनच्या काळात अर्थसाह्य अथवा महिनाभराचा शिधा देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात, देशात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असंघटीत मजूर आणि टपर्यावजा दुकानांमधून वयवसाय करणार्या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना आपली उपजीविका कशी चालवायची याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्याचा विचार केल्यास शेकडो चर्मकार बांधव चप्पला शिवून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पोट भरत आहेत. मात्र, गेल्या 22 मार्चपासून त्यांचे दुकान बंद असल्याने त्यांच्याकडे धान्यासह अनेक गरजेच्या वस्तूंची कमतरता भासत आहे. अशा स्थितीमध्ये त्यांची उपासमार होण्याचीच शक्यता आहे.
4 मे पासून अनेक आस्थापनांना शिथीलता प्रदान करण्यात आलेली आहे. या शिथीलतेचा फायदा घेऊन काही व्यापार्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. मात्र, हातावर पोट असणारे लोक यामध्ये भरडले जात आहेत. या वर्गाला दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने तसेच दुकाने उघडल्यानंतरही चप्पल शिवण्यासाठी कोणीही येणार नसल्याने त्यांची उपासमार निश्चित आहे. याचा विचार करुन ठाणे शहरातील गटई कामगार, असंघटीत कामगार यांना जिल्हा प्रशासनाकडून अर्थसाह्य अथवा महिना भराचा शिधा देणेत यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.