नॉन कोव्हीड मृत व्यक्तींच्या मृतदेहावर कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत तर
कोव्हीड बाधित मृतदेहावर थेट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची नियमावली
ठाणे
शहरातील हॉस्पिटलमध्ये नॉन कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेस जमा होणाऱ्या जवळच्या आप्तेष्ट, नातेवाईक व त्यांची मित्रमंडळी यांना कोविड-१९ चा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीचा मृतदेह घरी न पाठविता थेट स्मशानभूमीत पाठवून कमीत कमी लोंकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याबाबतचे तसेच कोव्हीड बाधित मृत व्यक्तींच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करीत थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून तशी नियमावली शहरातील सर्व रूग्णालय प्रशासनाला पाठविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कोविड-१९ संशयित व्यक्तीचा, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अशा व्यक्तीच्या, रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतांना शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता विल्हेवाट लावल्याचे निर्दर्शनास आलेले आहे. सदर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा, रुग्णाचा कोविड - १९ चा नमुना अहवाल पॉझिटीव्ह म्हणून प्राप्त झालेला आहे. यामुळे संबंधित मृत रुग्ण व्यक्तीच्या अंत्ययात्रेस जमा झालेले त्यांचे जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी या सर्वांना कोविड -१९ ची लागण होऊन त्यांच्या जीवाला धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर कोविड - १९ ची लागण होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रूग्णाचा मृतदेह घरी न पाठविता कमीत कमी लोंकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर केंद्र शासनाचे कोव्हीड-१९ संशयित, पाँझीटीव्ह रुग्णांचा मृतदेह हाताळण्याबाबत दिशा निर्देश आहेत. कोविड - १९ संशयित अथवा पॉझिटीव रुग्णांचा मृतदेह हाताळतांना मानांकित संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियांचे पालन करावे. यामध्ये हात धुणे, पीपीई किट वापरणे व मृत शरीरास लागलेल्या सर्व वस्तूंचे निर्जतृकाकरण करणे, मृत शरीराच्या बाहेरील बाजूस १टक्के हायपोक्लोराईटने निजतुकीकरण करुन शरीरास कोणतेही छिद्र नसलेल्या प्लास्टिक बॅाडीबॅगमध्ये ठेवणे, मृतदेह बॉडीबॅगमध्ये बंद केल्यानंतर सदरची बॉडीबॅग कोणत्याही परिस्थितीत उघडण्यात येऊ नये, सदर मृतदेह थेट शवागार किंवा स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे नेऊन त्याचा पीपाई किट घातलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत दाहसंस्कार अथवा दफन करावे. त्यानंतर सदर मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे निर्जतूकीकरण करून सर्व कचरा जैविक कचरा समजून त्याची जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट नियमावली नुसार विल्हेवाट लावावी. अशा पद्धतीने कोविड-१९ संशयित, पॉझीटीव्ह रुग्णाचे मृतदेह हाताळणेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कन्फर्म नॉन कोव्हीड 19 व्यक्ती मृत झाली व संबंधित मृतदेहाचे अंत्यसंस्कार नेहमीप्रमाणे करताना अंत्ययात्रेस उपस्थित असलेल्या आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यापैकी एक व्यक्ती कोव्हीड 19 बाबत संशयित किंवा पॉझिटीव्ह असेल तर उपस्थितांमध्ये कोव्हीड 19 चा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंत्ययात्रेस जे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते त्यांना सदरचा धोका टाळण्याच्या दृष्टीने हा निंर्णय घेण्यात आला आहे.
मृत व्यक्तींच्या अंत्यविधीत ज्याप्रमाणे नातेवाईकांची गर्दी होते ही बाब विचारात घेऊन मृत व्यक्ती जरी नॉन कोविड - 19 असली तरी त्याच्याबाबतीत शक्यतो कोव्हीड 19 रुग्णाच्या मृतदेहावर जसे अंत्यसंस्कार करण्यात येतात त्याप्रमाणे कार्यवाही केल्यास अनेक लोक कोव्हीड 19 चा संसर्ग होण्यापासून वाचू शकतात त्या पार्शवभूमीवर महापालिकेच्यावतीने ह नियमावली करण्यात आली आहे.
दरम्यान कन्फर्म नॉन कोव्हीड- १९ व्यक्तीचा दवाखान्यान मृत्यू झाल्यास मृतदेह घरी न पाठवता थेट स्मशानभूमी किंवा दफनभूमी मध्ये नेण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जेणेकरुन कोव्हीड - १९ या साथरोगाचा प्रसार टाळणे शक्य होईल व मृतकाच्या आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या जिवीताचा संभाव्य धोका टाळण्यास मदत होणार आहे.