सोसायटीत प्रवेश नाकारल्याने अख्खे कुटुंब रस्त्यावर
नवी मुंबई :
लॉकडाउन लागल्यापासून मुंबईकडे व्यक्तींना गावाकडे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गावाकडून मुंबईत आलेल्यांनाही सोसायटीत प्रवेश नाकारला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. जुईनगर सेक्टर २३ येथील कानोबा छाया सोसायटीत अहमदनगर येथून आलेल्या कुटुंबाला प्रवेश नाकारल्याने अख्खे कुटुंब रस्त्यावर बसून आहे.
त्यांच्याकडे वैद्यकीय दाखला व प्रवास पास असतानाही सोसायटीतील सदस्यांनी त्यांची अडवणूक केली. बाळासाहेब आंधळे पत्नी व दोन मुलांसह या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहतात. अडीच महिन्यांपूर्वी अहमदनगर येथील गावी गेले होते; परंतु लॉकडाउन वाढतच चालल्याने व जमापुंजी संपल्याने शुक्रवारी ते नवी मुंबईत आले. त्यांनी वैद्यकीय दाखल्यासह पोलिसांचा प्रवास परवानादेखील मिळवला आहे. यानंतर त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून हे कुटुंब सोसायटीच्या गेटवर बसून आहे.
घरमालकानेही त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला. दरम्यान, त्यांनी या प्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास कुटुंबासाठी सोसायटीचे फाटक उघडले; परंतु विनाकारण झालेल्या अडवणुकीमुळे कुटुंबीयांना मनःस्ताप सहन करावा लागल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.