कम्युनिटी किचन प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी- आमदार पाटील


कम्युनिटी किचन प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी- आमदार पाटील



ठाणे


जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, परंतु या संकटात गोर गरिबांना मदतीच्या नावाखाली राजकीय व आर्थिक संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील काही नेतेमंडळी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या साखळीतून धान्य वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी केला आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार करून स्वतःच्या मार्केटिंगसाठी वापर करणाऱ्या राजकीय नेत्यांवर व कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गैरव्यवहार करून निकृष्ट जेवण पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे आमदार राजु पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


याबाबत कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, जनावरांनाही देण्याच्या लायकीचे नाही. ही बाब गंभीर आहे. यावर कारवाई कोण करणार आहे? असा सवाल आ.पाटील यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे. हा गंभीर प्रकार असून या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ठाणे जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था, कम्युनिटी किचन या मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, तसेच हे धान्य हडप करून स्वतःचे मार्केटिंग करणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांवरही कारवाई करावी. अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवणाऱ्यांवर व धान्य वितरणामध्ये काळा बाजार करून परस्पर राजकीय नेत्यांना उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.