रेल्वेच्या कारभाराचा फटका मजुरांना
गावी जाण्यासाठी खडतर तपश्चर्या
ठाणे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका या मजुरांना बसत आहे. दिवसभर उपाशी राहून कुटुंबासह रेल्वेची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसल्याने या मजुरांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. ठाणे स्थानकातून परराज्यात गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांतील बाराशेहून अधिक मजूर पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. या मजुरांना रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी टीएमटीच्या बसगाडय़ाही आणण्यात आल्या होत्या. मात्र, गाडी स्थानकात दाखल व्हायला दुपार उजाडली. सायंकाळी साडेचार वाजेनंतरही ही गाडी सोडण्याची प्रक्रिया सुरूच होती. मात्र, या कालावधीत मजुरांना काही सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
बुधवारी दुपारी १२ वाजता , दिवा रेल्वे स्थानकातून बिहारला जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरली. या चुकीच्या माहितीच्या आधारे दिव्यात राहणारे शेकडो मजुरांचे जथे बुधवारी दुपारी रेल्वे स्थानक परिसरात जमले. गावाला जाण्यासाठी दोन दिवस आधी अर्ज भरण्यासाठी तासन्तास रांग लावल्याने दुपारी १२ वाजेपासून मजुरांनी कुटुंबासह स्थानकात गर्दी केली. भर उन्हात थांबल्यानंतर सायंकाळी बिहारला जाणारी गाडी आता ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणार असून त्यासाठी दिवा येथील चौकातून ठाण्याला जाण्यासाठी विशेष बस सोडणार असल्याचे या मजुरांना स्थानिकांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या या मजुरांनी दिवा चौक गाठले.
मात्र, दिवा चौकात रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहूनही मजुरांना बस गाडय़ांबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ८ वाजता काही स्थानिकांनी येऊन बिहारला जाणारी गाडी रद्द झाल्याची माहिती या मजुरांना दिली. त्यानंतर या शेकडो मजुरांनी घर गाठले. मात्र, दिवसभर उन्हात उभे राहूनही गाडी न आल्याने मजुरांचा हिरमोड झाला.