'माझा प्रभाग…कोरोनामुक्त प्रभाग' या भव्य स्पर्धेचे आयोजन

'माझा प्रभाग…कोरोनामुक्त प्रभाग' या भव्य स्पर्धेचे आयोजन
विजयी प्रभागासाठी मिळणार 50 लाखाचा निधी
पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची संकल्पना
नगरसेवकांनी पुढाकार घेण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन



ठाणे 


ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'माझा प्रभाग…कोरोनामुक्त प्रभाग' या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गेल्या पंधरा दिवसांत प्रभाग समिती क्षेत्रात कोणताही नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद न होणे आणि सध्याचे बाधित रूग्ण निगेटिव्ह होवून डिस्चार्ज झाल्यास अशा प्रभाग समितीस विकासकामासाठी 25 लक्ष रूपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे तर एक महिन्याच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद न होणे आणि असलेले बाधित रूग्ण बरे होवून डिस्चार्ज झालेल्या प्रभाग समितीस विकास कामासाठी 50 लक्ष रूपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
      आपला प्रभाग आणि पर्यायाने आपले शहर कोरोनामुक्त व्हावे यासाठी प्रत्येक नागरिकांचा, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.      सदरची स्पर्धा सेल्फी स्पर्धा, सेल्फी क्ल्यू व्हिडीओ, एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रक्टीस व्हिडीओ, सेन्सीटिव्ह सर्विस एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रक्टीस व्हिडीओ, संपूर्ण प्रभाग समिती (भाग 1), संपूर्ण प्रभाग समिती(भाग 2) आदी विविध गटात आयोजित करण्यात आली आहे.
      सेल्फी स्पर्धा गटात नागरिक विषांणूपासून संरक्षणासाठी कोणत्या नाविण्यपूर्ण पद्धती, संकल्पना राबवितात त्याचा व्हिडीओ महापालिकेने दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात. सेल्फ डिकलेरेशन स्पर्धा गटात एखाद्या कुटुंबात कोणी कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्यास त्याविषयीची माहिती तसेच कोव्हीड सदृष्य ताप, खोकला, सर्दी, डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्याची माहिती कुटुंबातील व्यक्तीने जबाबदारीने महापालिकेसोबत शेअर करावयाची आहे. सेफ्टी क्ल्यू व्हिडीओ स्पर्धेत कोव्हीड19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, त्यापासून बचाव करण्यासाठी नव्याने कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याबाबतची 30 सेकंदाची व्हिडीओ क्लीप तयार करून महापालिकेस पाठवायची आहे तर एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रक्टीस व्हिडीओ स्पर्धेतंर्गत कुटुंबामध्ये भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरवठा किंवा फूड पॅकेटस् करणाऱ्या व्यक्तींकडून होम डिलीव्हरीद्वारे प्राप्त वस्तू स्वीकारताना कोणती विशेष काळजी घेतली जाते याची माहिती 30 सेंकदाच्या व्हिडीओद्वारे महापालिकेस पाठवायचा आहे. याच गटात आपल्या कुटुंबातील व्यक्ती भाजीपाला, दूध, अन्नधान्य किंवा इतर वस्तू स्वतः आणत असतील तर कोणती काळजी घेतात याचीही माहिती 30 सेकंदाच्या व्हिडीओमधून पाठवायची आहे.