नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित करणार
नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश



ठाणे


 पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांची पाहणी तसेच नालेसफाई आदी कामाच्या पाहणीच्या आजच्या दुस-या दिवशी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अनेक ठिकाणी नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. दरम्यान नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चीत करण्यात येणार असून नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे आदेश श्री. सिंघल यांनी दिले आहेत.


महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत, परंतु पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईचे काम देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी महापालिका आयुक्त आग्रही आहेत. यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही निविदा मागवून प्रभाग समितीनिहाय कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत.
शहरातील नालेसफाई कामाचा वेग वाढला असून आज दुसऱ्या दिवशी देखील महापालिका आयुक्त श्री.सिंघल यांनी शहरातील नालेसफाई कामाची पाहणी केली.


या पाहणी दौऱ्यात त्यांनी नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधिताना जबाबदार धरणार असल्याचे स्पष्ट करून श्री. सिंघल यांनी शहरातील सर्व नाल्यांची खोलवर सफाई करून संपूर्ण गाळ काढण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. आजच्या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त श्री सिंघल यांनी वंदना, पनामा, मुलुंड चेकनाका, ब्राडमा, आयटीआय सर्कल, लक्ष्मी पार्क, कोरम नाला, बटाटा कंपनी आदी नाल्यांची पाहणी केली.