वागळे इस्टेट परिसरातील रेडझोनमधील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप
ठाणे
रेडझोनमधील नागरिकांना आपल्या विभागातून बाहेर पडण्यास मनाई घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तूदेखील त्यांना मिळत नाहीत. ही अडचण ओळखून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर भारतीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेंद्र उपाध्याय, ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष तिवारी यांच्यावतीने वागळे इस्टेट भागातील रामचंद्र नगर आणि पंचपरमेश्वर नगरमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. गाठीशी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशातच वागळे इस्टेटमध्ये मोठ्याप्रमाणात रुग्ण संख्या वाढीस लागली आहे. या भागामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानेे या भागाची गणना रेडझोनमध्ये करण्यात आली आहे. परिणामी, या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अन्नधान्याचा पुरवठा होत नसल्याने त्यांची उमासमार होण्याची शक्यता आहे. याची माहिती मिळाल्यानंतर सुरेंद्र उपाध्याय आणि संतोष तिवारी यांनी रामचंद्र नगर आणि पंचरमेश्वर नगर गाठून तेथे प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.