अत्यावश्यक सेवा वगळून मुंब्रा परिसर 27 मे पासून पूर्णत: बंद
ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा प्रभाग समितीमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या तसेच वारंवार सूचना देवून देखील नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत असल्याने (कोविड 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 26 मे 2020 च्या मध्यरात्रीपासून मुंब्रा प्रभाग समितीमधील परिसर पूर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात कोविड - 19 रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे ( कोविड - 19 ) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सचे पालन होत नसून लॉकडाऊन करुन सुध्दा त्यात काही सुधारणा दिसुन आलेली नाही. रस्ता , दुकाने , भाजीपाला मार्केट या ठिकाणची गर्दी वाढतच आहे, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 26 मे 2020 च्या मध्यरात्रीपासून पोलीस विभागामार्फत पोलीस गस्त वाढवून / पोलीस कर्मचारी, अधिकारी तेथे कायमस्वरुपी तैनात करण्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यास कळविण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोना (कोविड 19) चा प्रादुर्भाव या परिसरात वाढणार नाही. तसेच मुंब्रा प्रभाग समितीमार्फत संपूर्ण विभाग हा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये उपायुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी घेतला आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आज पासून 26 मे 2020 पर्यंत पूर्णतःबंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी , भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती केलेली भाजीपाला व फळांची दुकाने / मार्केट, दुध , अन्नधान्य , भाजीपाला , फळे , बकरी , मासळी , चिकन / मटण व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा ( Home Delivery ) संपुर्णत: बंद राहतील. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने/ दुध डेअरी सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यत सुरू राहणार आहेत (औषध दुकानातील औषध खाद्यपदार्थ वगळून ) सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.