कोव्हीड-19 हॅास्पीटलसाठी जागेची पडताळणी
महापालिका आयुक्तांनी केली ओवळा डेपो-बोरिवडसह 5 ठिकाणांची पाहणी
ठाणे
ग्लोबल इम्पॅक्ट हब पाठोपाठ आता ठाणे शहर आणि कळवा-खारेगाव येथे नवीन 1 हजार बेडचे कोव्हीड हॅास्पीटल उभारणीसाठी जागेची पडताळणी सुरू असून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काल आनंदनगर ओवळा येथील बस डेपो आणि कासारवडवली येथील बोरिवडे मैदानासह एकूण पाच ठिकाणांची पाहणी केली. ठाणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात साकेत येथे एमएमआरडीएच्या माध्यामातून 1 हजार बेडचे हॅास्पीटल उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि भविष्यात कोरोनाबाधित रूग्णांसाठी बेडस् कमी पडू नयेत यासाठी ठाणे शहर आणि कळवा परिसरात नव्याने 1 हजार बेडसचे हॅास्पीटल उभारणीच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून जागेची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर काल महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ओवळा-आनंदनगर येथील टीएमटी डेपो, डी मार्ट कासारवडवली येथील बोरिवडे मैदान, साकेत येथील पोलिस अकादमी मैदान, खारेगाव येथील सिंचन विभागाचे मैदान आणि कळवा पूर्व येथील मफतलाल मैदान आदी मैदानाची पाहणी करण्यात आली. यावेळी श्री. सिंघल यांनी सर्व जागेचे नकाशे तयार करून या जागांपैकी कोणत्या जागांवर तात्पुरते रूगणालय उभारणे शक्य आहे याची पडताळणी करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त(1) गणेश देशमुख, उप आयुक्त संदीप माळवी, उप नगर अभियंता प्रविण पापळकर, बांधकाम व्यावसायिक राजू व्होरा आणि जितेंद्र मेहता आदी उपस्थित होते.