वीजपुरवठा खंडीत झाल्याने work from home मध्ये अडथळा
ठाणे
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालये बंद असल्याने शहरातील अनेक नागरिक घरातून कार्यालयीन काम करत आहेत. मात्र कळवा, पारसिकनगर, खारीगाव, दिवा या भागांत शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने घरातून काम करणाऱ्यांना त्रास झाला. ठाण्यातील विविध भागांत वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने दिव्यातील वीजपुरवठा १६ तास तर कळवा, पारसिकनगर आणि खारीगाव परिसरातील वीजपुरवठा पाच तासांसाठी खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे उकाडय़ाने हाल झाले, तर टाळेबंदीने सध्या घरातून काम करणाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. टोरेंट कंपनीच्या पथकाने शनिवारी दुपारी एक वाजता दिव्यातील तर दुपारी अडीच वाजता कळव्यातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.
शुक्रवारी रात्री दिवा पूर्वेतील साबे गाव परिसरात भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रात्री ९ वाजल्यापासून साबे गाव, दिवा पश्चिम, ऐनजे कॉम्प्लेक्स आणि दिवा रेल्वे स्थानक परिसर या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच ठाण्यातील साकेत खाडीवर असलेल्या वीजवाहिनीत शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्याने कळव्यातील पारसिकनगर आणि खारीगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
दिव्यातील भूमिगत वीजवाहिनीतील बिघाड तात्काळ शोधणे शक्य होत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात टोरेंट कंपनीच्या पथकाला अडथळा येत होता. अखेर पथकातील कर्मचाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभारून १६ तासांनी दिव्यातील वीजपुरवठा पूर्ववत केला. तर शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास साकेत खाडीवरील वीजवाहिनीचा बिघाड दुरुस्त करण्यात आला, अशी माहिती टोरेंट कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन भदियानी यांनी दिली.