करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फसवणूकीपासून सतर्क राहण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन
ठाणे
देशासह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे कामधंदा बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून यामुळेच कर्मचाऱ्यांना पुढच्या काही महिन्यांत पगार मिळेल की नाही, याची चिंता सतावू लागली आहे. तसेच अनेकांनी गृह, वाहन, वैयक्तिक तसेच इतर कर्ज घेतले असून त्याचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाच, आता काही भामटय़ांनी करोनाच्या नावाने नागरिकांची ऑनलाइनद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. मात्र या भामटय़ांच्या जाळ्यात कोणीही अडकू नये म्हणून ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाच्या लढय़ासाठी आर्थिक देणगी, भारतीय रिझव्र्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार कर्जदारांचे मासिक हप्ते तीन महिने स्थगित करणे, अशा आशयाचे खोटे संदेश आणि संकेतस्थळाच्या लिंक पाठविल्या जात असून अशा संदेशांना भुलून जाऊ नका, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
देश-विदेशातील भामटय़ांच्या टोळ्या सिक्रय झाल्या असून या टोळ्या फसवणूक करण्यासाठी नागरिकांच्या मोबाइलवर खोटे संदेश पाठवू लागले आहेत. तर काही भामटे नागरिकांना मोबाइलवर संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. करोनाच्या लढय़ासाठी आर्थिक देणगी, भारतीय रिझव्र्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार कर्जदारांचे मासिक हप्ते तीन महिने स्थगित करणे, अशा आशयाचे खोटे संदेश आणि संकेतस्थळाच्या लिंक पाठविल्या जात आहेत. या संदेशातील लिंकवर नागरिकांनी बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांची माहिती टोळीला मिळू शकते. त्याआधारे हे भामटे संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेऊन आर्थिक फसवणूक करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारचे संदेश आले तर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.