ठाण्यात कोरोनाग्रस्त महिलेची सुखरूप प्रसुती
ठाणे
कोरोनाचा विळखा अधिक वाढत असतानाच ओवळा येथील वेदांत रुग्णालय आणि फर्टिलिटी अॅण्ड वुमन केअर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कोरोनाग्रस्त महिलेची प्रसुती झाली. तिने एका सुदृढ बालकाला जन्म दिला. बाळाचे वजन आठ पाऊंड आहे. बाळ आणि आई दोघेही सुखरुप असल्याचे समजते. सुदैवाने त्या बालकाला कोरोना नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात एक आनंदाचे वातावरण पसरले आहे. वेदांत रुग्णालय बाळाची चांगली काळजी घेत आहे. प्रसुतीनंतर त्याला त्वरित विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. सध्या बाळाची आई बाळाला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे पाहत आहे.माझे बाळ सुखरूप जन्माला आले यात मी समाधानी आहे. वेदांत रुग्णालयाने या संकटात माझी आणि माझ्या बाळाची विशेष काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, असे बाळाच्या आईने सांगितले. बाळाच्या आईवर उपचार सुरू आहेत. त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून लवकरच तब्येतीत सुधारणा होईल अशी आशा रुग्णालयाच्या प्रशासनाने व्यक्त केली आहे.