टाळेबंदीच्या काळात चोरीचेच एकूण १० गुन्हे दाखल
ठाणे :
संचारबंदीच्या काळातही दुचाकी चोरी होत असल्याने ठाणेकर आश्चर्य व्यक्त करत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३० मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत चोरीचे १० गुन्हे दाखल असून यामध्ये पाच गुन्हे हे वाहन चोरीचे आहेत. तसेच कोरोनाच्या प्रतिबंध उपायाकरिता ठाणे जिल्ह्यात मद्य विकण्यास तसेच मद्यपान करण्यास बंदी घातलेली आहे. परंतु मद्याचा विरह सहन करू न शकणाऱ्यांनी थेट देशी-विदेशी बार आणि पान टपऱ्यावरील सिगारेट चोरी केल्याचे प्रकार उघड झाले आहेत,
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील जवळ-जवळ सर्वच पोलीस अधिकारी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव रोखण्यास व्यग्र असताना चोरटय़ांनी मात्र याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. ३० मार्च ते १५ एप्रिल या टाळेबंदीच्या काळात ठाणे पोलीस आयुक्तालयात फक्त चोरीचेच एकूण १० गुन्हे दाखल आहेत. यातील तीन गुन्ह्य़ांत तर चोरटय़ांनी एक विदेशी मद्याच्या दुकानातील दारूच्या बाटल्या चोरी केल्या आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात चोरटय़ांची मजल देशी दारूच्या बारममध्ये चोरी करण्यापर्यंत गेली आहे. तर तिसऱ्या एका प्रकरणात पान टपरीतील हजारो रुपयांच्या सिगारेटची पाकिटेच चोरी करण्यात आली आहेत.