कोरोना साथीशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष

कोरोना साथीशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष



ठाणे :


ठाणे महापालिका प्रशासनाचे कोरोना साथीशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांच्या सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ठामपाची डोकेदुखी वाढली आहे. रुग्ण आणि विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे पालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे. कळवा येथील पालिका रुग्णालय व काही खासगी रुग्णालयांत आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या पारिचारिकांना दोन वेळचे पुरेसे जेवण उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही प्रशासन आणि महापौरांकडे दाखल झाल्या आहेत. महापालिकेच्या भाईंदरपाडा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या संशयित रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. 


 महापालिकेला वेगवेगळ्या प्रकल्पांमधून मिळालेल्या घरांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांची पुरेपूर काळजी घेता यावी तसेच त्यांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये यासाठी कठोर नियम असावेत, अशा सूचना यापूर्वीही आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून विविध तक्रारींची यादी काही लोकप्रतिनिधींना प्राप्त झाली असून यातील काही प्रकारांची गंभीर दखल घ्यावी लागेल असे चित्र आहे.


मागील काही दिवसांपासून भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात दाखल असलेल्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील विलगीकरणात असलेल्या शंभराहून अधिक रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी येथील संशयित रुग्णांची सोय व्हावी म्हणून एक बाटला ठेवण्यात आलेला आहे. या बाटल्यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग अधिक बळावण्याची शक्यता आहे. विलगीकरणात असलेल्या प्रत्येकाला स्वतंत्र पाण्याची बाटली देण्याची आवश्यकता आहे. असे असताना एका मोठय़ा जारमधून सार्वजनिक पाणपोयीप्रमाणे संशयित रुग्ण पाणी भरताना दिसत आहेत.