टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्कची निर्मिती

टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्कची निर्मिती



ठाणे


करोना विषाणू संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संसर्गापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात मास्कच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरात मास्कचा तुटवडा जाणवू लागला असून मास्कच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या जीवन उन्नती अभियानाद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मास्क निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे आणि प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी केले.


त्यामुळे जिल्ह्य़ातील भिवंडी,  शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांच्या ग्रामीण भागातील सुमारे ९५ बचत गटांनी मास्क निर्मितीच्या कामासाठी पुढाकार घेतला असून त्या गटांमध्ये १ हजार ५०० विधवा, आदिवासी आणि वंचित घटकातील महिलांचा समावेश आहे. या महिलांतर्फे साधे आणि तीन थरांच्या कॉटन मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी साध्या मास्कची किंमत १२ ते १५ रुपये तर तीन थरांच्या कॉटन मास्कची किंमत केवळ २० रुपये आहे. महिलांनी तयार केलेल्या या मास्कची किंमत कमी असल्याने त्याची मागणी वाढली असून आत्तापर्यंत या महिलांनी ५१ हजार ४०० मास्कची विक्री केली असून त्यातून बचतगटांना ७ लाख २३ हजार ६०० रुपयांचा नफा झाला आहे. सध्या टाळेबंदी असल्याने देशातील ग्रामीण भागातील रोजंदार कर्मचाऱ्यांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र, या परिस्थितीतही मास्क निर्मितीमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.