खोटे किंवा फसवणूक करणारे संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन

खोटे किंवा फसवणूक करणारे संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन



ठाणे 


करोनाच्या भीतीने टाळेबंदी झाल्यापासून मोबाइल व समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. मोबाइल किंवा समाजमाध्यमावर आलेला प्रत्येक संदेश फॉरवर्ड करण्यात नागरिकांची तत्परता दिसून येते. यापैकी अनेक संदेश खोटे किंवा दिशाभूल करणारे असतात. त्या संदेशांची खातरजमा न करता ते प्रसारित करण्यात येतात. अनेकदा या माध्यमांतून अफवा पसरवण्यातही येतात. विशेषत: १ एप्रिल अर्थात ‘एप्रिल फूल’च्या दिवशी करोनाविषयी अफवा पसरवण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी  अशा प्रकारचे खोटे संदेश किंवा फसवणूक करणारे संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. असे संदेश प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


करोना विषाणूविषयी अफवा पसरविणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करून नागरिकांना भयभीत करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच, ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने अफवा पसविणाऱ्याचे प्रकार दुपटीने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी आता अफवा पसविणारे संदेश पाठविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला असून यामुळे अफवा पसरविणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच टाळेबंदीच्या काळात मोबाइल संदेशांची देवाणघेवाण करण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत संवाद साधा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे ‘केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून घरीच राहा. ठाणेकरांनी पोलिसांना सहकार्य करावे. त्यामुळे १ एप्रिलला तसेच इतर दिवशीही नागरिकांनी अफवा पसरवू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असा इशारा ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.