कृषिमालाच्या बाजारपेठा तातडीने सुरू करण्याचा निर्णय
ठाणे :
वाशी येथील धान्याच्या घाऊक बाजारपेठेमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरात कृषिमालाचा पुरवठा होतो. काही दिवसांपूर्वी धान्य बाजारात एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याने इतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई असपासच्या परिसरात कृषी मालाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मुंबई कृषी बाजार समिती अंतर्गत वाशी येथील कृषिमालाच्या बाजारपेठा तातडीने सुरू करण्याचा निर्णय रविवारी प्रशासन आणि व्यापारी तसेच माथाडी संघटना यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बाजारात गर्दी होऊ नये, तसेच सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जावे, यासाठी दोन दिवसांत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात धान्यबाजार आवार सुरू करण्यात येणार असून हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास पूर्ण बाजार सुरू करण्याचा निर्णय पुढील टप्प्यात घेण्यात येणार आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारी धान्य बाजारातून शेकडो टन कृषिमाल मुंबई ठाण्यात रवाना झाला होता. मात्र, राज्यात करोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समिती पुन्हा सुरू करावी, असा राज्य शासनाने व्यापाऱ्यांकडे आग्रह धरला होता. त्या अनुषंगाने अतिरीक्त मुख्य सचिव (पणन) श्री अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सायंकाळी धान्यबाजार आवारातील व्यापारी, माथाडी आणि वाहतूकदार यांची बैठक घेतली. त्यात नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार , कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल उपस्थित होते.