मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण



भाईंदर -


मीरा भाईंदरमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. तर कोरोनाचे दोन रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक बातमी पालिकेने दिली आहे. गेल्या दिवसभरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या २२ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पालिकेने सुरू केलेल्या मंडई आता सकाळी ९ ते दु. १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवल्या जाणार आहेत.


मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा काल ७ एप्रिल रोजी पहिला बळी गेला आहे. पूजानगरमधील सदर ५० वर्षीय इसम हा जोगेश्वरीच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल होता. पालिकेने पूजा नगर व परिसरात निर्जंतुकीकरण तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. परिसर बंद केला आहे. सदर रुग्णाची माहिती आजच पालिकेला मिळाली.


नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये भाईंदरच्या गोडदेव भागातील ३० वर्षीय तरुण, एमआय मस्जिद - आदर्श शाळेजवळील ३६ वर्षीय इसम व मीरा रोडच्या आरएनए ब्रॉडवे एहेन्यूमधील ७३ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांना पालिकेच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. आरएनए ब्रॉडवेमध्ये या आधी एक महिला रुग्णास कोरोना झाल्याने दाखल केले असून, नव्याने आढळलेले दोन रुग्ण हे त्याच ठिकाणीचे आहेत.


कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, घरीच रहावे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे. पालिका मंडईत लोकांना सांगून देखील गर्दी कायम असल्याने काशी व उत्तन येथील बाजार बंद केले असून अन्य पालिका मंडई आता फक्त सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवल्या जाणार आहेत. सर्दी, खोकला व ताप सारखी लक्षणे आढळल्यास त्वरित पालिका वैद्यकीय विभागाशी संपर्क साधा, असे आयुक्तांनी म्हटले आहे.