रस्त्यांवर अग्निशमन दलाच्या मदतीने यंत्राच्या सहाय्याने फवारणी
ठाणे
ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात असे ७० हंगामी आणि १५० कायमस्वरूपी कामगार ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. कळवा, मुंब्रा डेंजर झोनमध्ये आल्यानंतर ठाणे महानगर पालिका आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करणार्या फायलेरिया विभागामार्फत कोरोना बाधित परिसरात मोठ्या प्रमाणात फवारणी केली जात आहे. रस्त्यांवर अग्निशमन दलाच्या मदतीने यंत्राच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. तर झोपडपट्टी, सोसायट्या आणि कोरोना बाधित रुग्णाच्या घराशेजारी कामगारांच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे.
पालिकेकडे सुमारे १५० कामगार कायमस्वरूपी शहरात फवारणीचे काम करत असतात. तर पावसाळ्यात रोगराई वाढत असल्याने चार महिन्यांसाठी हंगामी तत्वावर तात्पुरत्या कामगारांची ठेकेदारी पद्धतीवर भरती केली जाते.शहरात अशा प्रकारचे सुमारे ७० कामगार हे काम करत आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे पॉझटिव्ह रुग्ण आढळून येतात, त्या ठिकाणचा परिसर निर्जंतुक करण्यासाठी या कामगारांना पाठविले जाते. ठेकेदाराकडून त्यांना अंगावर परिधान करणारा सूट, हातमोजे, मास्क, सॅनिटाइझर पुरविले जाते.
मात्र ठेकेदाराकडून अवघा १२ हजार रुपये पगार दिला जातो. पगाराच्या कोर्या रजिस्टरवर कामगारांच्या सह्या घेतल्या जातात. कामगार विमा रुग्णालयाचे पैसे कापले जात असतानाही गेल्या चार वर्षांपासून अद्याप त्यांना कामगार रु ग्णालयाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. गेल्या दिवाळीचा बोनस आणि गेल्या महिन्याचा पगार देखील अद्याप दिला गेला नसल्याचा आरोप हे हंगामी कामगार करत आहेत. ठेकेदार सांगेल त्या वेळेला, अगदी जेवता जेवताही फवारणीसाठी यावे लागते. असेही कामगारांचे म्हणणे आहे. हंगामी कामगारांना अशा कितीही अडचणी असल्या तरीदेखील ते ठाणेकरांचे आरोग्य बिघडू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून औषधांची फावरणी करत आहेत.