शालेय पुस्तकांची आणि पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राची परवानगी

शालेय पुस्तकांची आणि पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राची परवानगी



नवी दिल्ली


 टाळेबंदीनंतर करोनाच्या रुग्णांमध्ये १६ पटीने वाढ झाली. मात्र, नमुना चाचणीचे प्रमाणही २४ पटीने वाढवण्यात आले. चाचण्यांमध्ये वाढ करूनही रुग्णांमध्ये होणारी वाढ तुलनेत कमी आहे. या पार्श्वभूमीवर शालेय पुस्तकांची दुकाने, पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. तसेच, नाविकांना ये-जा करण्यासही अनुमती देण्यात आली असून, फलोत्पादन विषयक कामांनाही परवानगी मिळाली आहे.   गेल्या २८ दिवसांमध्ये १२ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. आठ नवे जिल्हे करोनामुक्त झाले आहेत. ७८ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही. गेल्या २४ तासांमध्ये १,४०९ नव्या रुग्णांची भर पडली असून, ३८८ रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णांची संख्या २१,३९३ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४१ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू ६८१ झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.