कल्याण, डोंबिवलीतील वाळूमाफिया सक्रीय

कल्याण, डोंबिवलीतील वाळूमाफिया सक्रीय



कल्याण


ठाणे जिल्ह्य़ातील महसूल आणि पोलीस प्रशासन करोना साथीचा फैलाव रोखण्याच्या कामात गुंतले आहेत.  या परिस्थितीचा फायदा घेत कल्याण-़डोंबिवलीतील वाळू माफिया सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीत खाडीकिनारा परिसरात राहणारे रहिवासी या भागात सकाळ, संध्याकाळ शतपावलीसाठी जातात. त्यांना हा सगळा प्रकार दिसून येत आहे. करोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण आला असून रेतीउपसा करणाऱ्यांमुळे प्रशासनावर अधिक ताण वाढत आहे. मागील २० दिवसांपासून कल्याण, डोंबिवली खाडीकिनारी वाळूमाफिया दिवस-रात्र वाळूचा बेकायदा बेसुमार उपसा होत आहे. किनाऱ्यावर उपसलेली वाळू तात्काळ डम्परमध्ये भरून ती जवळच्या झाडाझुडपांच्या आड लपवली जात आहे. वाळूमाफियांच्या या कृत्यामुळे खाडीतील जीवसृष्टीवर संकट आले आहे.


डोंबिवलीत गणेशनगर, कुंभारखाणपाडा, रेतीबंदर, कोन, कोपर भागांत वाळूमाफियांनी तळ ठोकले आहेत. वाळूमाफिया दिवसरात्र सक्शन पंपाच्या साहाय्याने रेतीउपसा करत आहेत. वाळूउपसा करत असताना या कामगारांकडून तोंडाला मास्कही लावले जात नाहीत. टाळेबंदीमुळे अधिकृत आणि बेकायदा सर्व प्रकारची इमारत तसेच चाळींची बांधकामे ठप्प आहेत. त्यामुळे वाळूला मागणी नसल्याने माफिया उपसा केलेल्या वाळूचे खाडीकिनारी आडबाजूला ढीग मारून ठेवत आहेत. वाळूमाफियांच्या या गैरकृत्यामुळे खाडीतील जीवसृष्टीवर संकट आले आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात अशी बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल आणि पोलिसांनी एकत्रितपणे कारवाई करून त्यांच्यावर बेकायदा वाळूउपसा आणि साथ नियंत्रण आपत्ती कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.