महापालिका आयुक्तांनी केली वागळे प्रभाग समितीची पाहणी

महापालिका आयुक्तांनी केली वागळे प्रभाग समितीची पाहणी


झोपडपट्टी  दा़टलोकवस्तीमध्ये लक्ष देण्याच्या केल्या सूचना



 ठाणे


वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी करून झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये याक़डे जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सिंघल यांनी वागळे इस्टेट मध्ये साठे नगर, रोड नं. 22, रोड नं. 28, सी. पी. तलाव या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांनी वागळे प्रभाग समितीमध्ये कोणत्या विभागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याची कारणे काय आहेत याचा आढावा घेवून झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.         त्याचबरोबर ज्या ठिकाणी बोधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरात तातडीने सर्वेक्षण सुरू करून त्यामधील संशयित किंवा कोरोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींनी भायंदरपाडा किंवा कासारवडवली या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत परिमंडळ उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, कार्यकारी अभियंता धुमाळ, उप अभियंता आणि इतर उपस्थित होते.


ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये वारंवार सूचना देवून देखील नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत रस्त्यावर, दुकानांवर, भाजीपाला दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या सुचनेनुसार ( कोविड - 19 )विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री 12.00 वाजले पासून  प्रभाग क्रमांक 13, 14 व 15 पर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.
    ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात प्रभाग क्रमांक 13, 14, 15 येथे कोविड -19 रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोविड - 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन करुन देखील नागरिक रस्त्यावर, दुकानांवर, भाजीपाला दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून रस्त्यावरील वर्दळ देखील वाढत आहे. नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सचे पालन होत नसून लॉकडाऊन करुन सुध्दा त्यात काही सुधारणा दिसून आलेली नाही.


 सबब प्रभाग क्रमांक 13 मधील संभाजीनगर, लेनिननगर, जीजामातानगर, रामचंद्रनगर 1, 2 व 3 ज्ञानेश्वरनगर, काजुवाडी, लुईसवाडी, हाजुरी, प्रभाग क्रमांक 14 मधील सावरकरनगर - लोकमान्यनगर जुना बस डेपो, डवलेनगर, यशोधननगर, रखेची माता चोक, महात्माफुले नगर, लोकमान्यनगर पाडा नं.1, वेदांत कॉम्प्लेक्स रोड, विजयनगर आणि प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर, रुपादेवी पाडा, साठेनगर, हनुमाननगर, आंबेवाडी, जय भवानीनगर आदी परिसर पुर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.  या सर्व परिसरात प्रशासनाच्यावतीने पोलिस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले असून संपूर्ण विभाग हा पुर्णत: बंद करण्यात येणार आहे.


तसेच या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आज पासून 3 मे 2020 पर्यंत पूर्णतःबंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी,  भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व महापालिकने तात्पुरती केलेली भाजीपाला व फळांची दुकाने / मार्केट, दुध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बकरी, मासळी, चिकन / मटण व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा ( Home Delivery ) संपुर्णत : बंद राहतील. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने/ दुध डेअरी ( औषध दुकानातील खाद्यपदार्थ वगळून ) सुरू राहणार आहेत असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.