प्रशासनाच्या समन्वयातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रशासनाच्या समन्वयातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


 

ठाणे

सामाजिक बांधिलकीतून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू, स्थलांतरीत लोकांना समाजातील अशासकीय संस्था, विविध सामाजिक गट व दानशूर व्यक्ती प्रशासनाच्या मदतीने वेळेत मदत पोहचवित आहेत. जिल्हयातील शेकडो लोकांनी या गरजू लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी सर्व लोकांचे आभार मानले आहेत. 

कोरोना संसर्ग परिस्थितीत प्रशासन एकीकडे आरोग्य सेवा पुरविणे, नव्याने उभ्या करणे यामध्ये व्यस्त आहे. तसेच पोलीस प्रशासनावरतीही संचार बंदी बाबत बंदोबस्ताचे कार्य आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून ठिकठिकाणी गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

या सर्व लोकांना व विविध ठिकाणी घरामध्ये असलेल्या लोकांना मदत करणेबाबत प्रशासनाने आवाहन केले होते. यानंतर शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. यातून निधी प्रत्यक्ष न स्विकारता त्यांच्याकडून त्याच दिवशी आवश्यक किराणा मालाचे पॅकेट तयार करून घेणेत येत आहेत. या किराणा पॅकेट ची मागणी आल्यास तात्काळ प्रशासन किंवा संबंधित संस्था किंवा व्यक्ती मार्फत गरजूला मदत दिली जात आहे. 

याकरिता *जिल्हास्तरावर मदतीबाबत टिम* तयार केली आहे. तहसिलदार व गरजू लोकांकडून मागणी आल्यास या टिममार्फत अशासकीय संस्था, व्यक्तींना संपर्क साधून संबंधितांना मदत देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की ज्या ठिकाणी स्थलांतरीत अथवा गरजू लोकांना मदत हवी आहे, त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधा. 

*मदत देणा-या संस्था व व्यक्तींनी प्रशासनाशी समन्वय साधावा* : जिल्हयातील अनेक ठिकाणी विविध संस्था तसेच संघटना मदत करत आहेत. त्यांनी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी समन्वय साधून साहित्याचे वाटप करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कारण गरजू लोकांना मदत मिळावी व एकाच ठिकाणी वारंवार मदत टाळण्यासाठी संबंधित स्थलांतरीत लोकांची व गरजू लोकांची नोंद होणे गरजेचे आहे. त्यांना मदत करताना संबंधित संस्थांनी आपल्याकडे त्या पद्धतीने माहिती ठेवणेही आवश्यक आहे. 

जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी  लोकांना आवाहन केले आहे की, आपणही मदत देणार असाल तर निधी स्वरूपात न देता जीवनावश्यक वस्तू स्वरूपात द्यावी. तसेच  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मदत करावी.

 

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ठाणे* ०२२-२५३०१७४०

या क्रमांकावर  नागरिकांनी समस्यांबाबत संपर्क साधावा  असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर  यांनी केले आहे.