करोनाच्या भीतीमुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रात

मटणाच्या दुकानांवर ग्राहकांच्या रांगा



ठाणे :


 ‘करोना’ विषाणूबाबत गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांमुळे चिकनची मागणी घटली असून त्याचबरोबर चिकनचे दरही घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी १३० रुपये किलो दराने विकली जाणारी कोंबडी मात्र ५० रुपये किलो दराने विकली जात आहे. मंगळवारी हेच दर कायम होते, अशी माहिती कोंबडी विक्रेते चंद्रशेखर तेरडे यांनी दिली. तरीही अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली. त्याऐवजी अनेकांनी मटण खाणे पसंत केले. त्यामुळे पहाटे ४ वाजल्यापासूनच मटण दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी सायंकाळपर्यंत ग्राहकांची गर्दी होती. ठाणे शहरात दरवर्षी धुळवडीच्या दिवशी ११०० ते १२०० बोकडांची विक्री होते. यंदा मात्र त्यामध्ये वाढ होऊन सुमारे दीड हजार बोकडांची विक्री झाल्याची माहिती मिळत आहे.


गेल्या महिन्यांपूर्वी विविध कारणांमुळे बकऱ्याच्या मटणाची प्रति किलो ६०० ते ७०० रुपयांनी विक्री होत होती. धुळवडीच्या दिवशी चिकनकडे नागरिकांनी पाठ फिरवून मटणाला पसंती दिली होती. त्यामुळे बकऱ्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र कोणतीही वाढ विक्रेत्यांनी केली नव्हती. त्यामुळे बकऱ्याचे मटण प्रति किलो ६०० ते ७०० रुपयांनी विक्री होत होती. धुळवडीच्या दिवशी चिकन आणि मटणाची मागणी वाढते. मटणापेक्षा चिकन स्वस्त असल्यामुळे अनेक जण चिकन दुकानांबाहेर गर्दी करतात. त्या तुलनेत मटण दुकानांबाहेर कमी गर्दी असते. यंदा मात्र नेमके उलटे चित्र दिसून आले. चिकन दुकानांबाहेर ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली तर मटण दुकानांबाहेर मात्र ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोंबडीचे मांस खाल्ल्यामुळे ‘करोना’ विषाणूचा संसर्ग होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित होत आहेत. मात्र या अफवा असल्याचे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. असे असले तरी आजही चिकनमुळे करोना होत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. त्याचाच फटका धुळवडीच्या दिवशी कोंबडी विक्रीच्या व्यवसायाला बसला.