करांच्या माध्यमातून ठामपाची २५९ कोटी रुपयांची अधिक वसुली

करांच्या माध्यमातून ठामपाची २५९ कोटी रुपयांची अधिक वसुली



ठाणे : 
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी विविध विभागांना कराच्या माध्यमातून उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध विभागाकडून करवसुलीवर भर देण्यात येतो. यंदाच्या म्हणजेच २०१९-२० या वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध विभागांना ३७५०.०९ कोटी रुपयांचे तर सर्वसाधारण सभेने ४२२१.४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, विविध विभागांनी फेब्रुवारी महिना अखेपर्यंत कराच्या माध्यमातून २२९५.१७ कोटी रुपयांची उत्पन्न वसुली केली असून गेल्या वर्षीच्या  तुलनेत त्यामध्ये २५९ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 
नव्या मालमत्तांना कर आकारणी करणे, पाणी देयकातील त्रुटी दूर करणे, बांधकाम प्रकल्प शुल्क यामुळे उत्पन्न वसुलीचा आकडा वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत आयुक्त जयस्वाल यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी ६१.२० टक्के तर सर्वसाधारण सभेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी ५४.३७ टक्के कराची वसुली झाली आहे. तसेच उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अवघे २० दिवस शिल्लक राहिले असून या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये ठरवून दिलेल्या म्हणजेच ४२२१ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.ठाणे महापालिकेला करवसुलीसाठी अवघे २० दिवस शिल्लक राहिले असून या काळात उर्वरित कराची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कालावधीत मालमत्ता कर विभागाकडून १०० कोटी, शहर विकास विभागाकडून १०० कोटी, शासनाकडून जीएसटी आणि अनुदानापोटी १२५ कोटी आणि इतर विभागांकडून ५० ते ६० कोटी रुपयांची वसुली होणार असून त्यामुळे उत्पन्नामध्ये ३५० ते ४०० कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचा अंदाज पालिकेने वर्तविला आहे.
आर्थिक मंदीमुळे ठाणे शहरात उभ्या राहिलेल्या गृहप्रकल्पातील घरांच्या विक्रीला काहीसा लगाम बसल्याचे चित्र होते. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प राबविण्यासाठी विकासकांनी हात आखडता घेतल्याने शहर विकास विभागाला उत्पन्न वसुलीच्या उद्दिष्ट पार करणे शक्य होणार नसल्याची शक्यता पालिका सूत्रांकडून वर्तवली जात होती. मात्र, शहर विकास विभागाने फेब्रुवारी महिनाअखेपर्यंत ९२४ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ६५२ कोटी रुपयांची उत्पन्न वसुली केली आहे. गेल्या वर्षी शहर विकास विभागाने ७२२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ६५० कोटी रुपयांची वसुली केली होती. त्यामुळे यंदा या विभागाला ९२४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित २० दिवसांमध्ये २७२ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान या विभागापुढे आहे. शहरातील काही बडय़ा प्रकल्पांमुळेच शहर विकास विभागाला हा आकडा गाठणे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.